शिवस्मारक बोट दुर्घटना अपघात नव्हे घातपात : अशोक चव्हाण

येस न्युज मराठी नेटवर्क : अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणाऱ्या बोटीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांच्या चौकशीच्या मागणीनंतर झालेला अपघात, घातपात तर नाही ना? असा संशय अशोक चव्हाण यांनी केला. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली आहे.

शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जात असताना बुधवारी एका स्पीड बोटीला अपघात झाला. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन ही बोट जात होती. या दुर्घटनेत बोटीतील सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Comments