18 of February 2019, at 3.59 pm

नवरात्रोत्सव निमित्त अंबाबाई मंदिर एक दिवसासाठी बंद...

कोल्हापूर - येत्या १० ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी अंबाबाई मंदिर एक दिवसासाठी बंद करण्यात आले आहे. सकाळी १० वाजल्यापासून मंदिरातील स्वच्छतेला सुरुवात झाली असून, आज भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार नाही.

स्वच्छतेदरम्यान अंबाबाई मूर्तीला कोणत्याही प्रकारची इजा पोहचू नये, यासाठी मूर्ती झाकून ठेवण्यात आली आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त एक आठवडा आधीपासूनच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तयारीची सुरुवात होते. अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याच्या स्वच्छतेला आज सुरुवात झाली. त्यामुळे दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने अंबाबाईच्या मूर्तीला येरले पद्धतीने सुरक्षित झाकून ठेवण्यात आले आहे.

अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोजच हजारोंच्या संख्येने भाविक कोल्हापुरमध्ये येत असतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिरातीलच सरस्वती देवीच्या मंदिरामध्ये अंबाबाईची उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. दिवसभर गाभाऱ्यातील संपूर्ण स्वच्छता करण्यात येणार असून, रात्री ८ नंतर मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. 

Comments