पंडित संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर

१ लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप...

पुणे - मेवाती घराण्याचे प्रख्यात तरुण गायक पंडित संजीव अभ्यंकर यांना २०१८ या वर्षीचा गानसरस्वती पुरस्कार जाहीर झाला आहे. गानसरस्वती कै. किशोरी आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे आद्य शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार मागील वर्षापासून सुरु केला आहे.

दरवर्षी भारतीय शास्त्रीय कंठसंगीत क्षेत्रात प्रथितयश मिळवलेल्या ५० वर्षांखाली कलाकारास हा पुरस्कार दिला जातो. १ लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१७ साली पहिला गानसरस्वती पुरस्कार प्रख्यात गायिका मंजिरी असनारे यांना प्रदान करण्यात आला आहे. पंडित अभ्यंकर हे प्रख्यात गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे शिष्य आहेत.

त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वर्षे कार्यक्रम गाजविले आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. गायकच नव्हे तर संगीतकार म्हणूनही त्यांनी नाव कमावले आहे. प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्याबरोबर त्यांनी ‘जसरंगी’ नामक जुगलबंदीचा अभिनव कार्यक्रम अनेक ठिकाणी यशस्वी केला आहे.

Comments