18 of February 2019, at 3.26 pm

तृप्ती देसाईंना कात्रजमधून अटक; डॉक्टरांना धमकी दिल्यानं कारवाई

ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना दिली होती धमकी

पुणे: सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना कात्रजमधून अटक करण्यात आली आहे. तृप्ती देसाई यांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना काळं फासण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन देसाई यांना अटक केली. 

डॉ. अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आठवडाभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन केली होती. चंदनवाले यांच्या तोंडाला काळं फासू, असा इशारादेखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली. कात्रजमधील राहत्या घरातून देसाई यांना अटक करण्यात आली. 

'डॉ. चंदनवाले कोठेही अपंग असल्याचं दिसत नाहीत, आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी खोटं प्रमाणपत्र बनवून घेतलं आणि ससूनच्या अधिष्ठातापदी नेमणूक करून घेतली,' असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. 'कोणत्याही पदावर 3 वर्षांपेक्षा अधिक काळ राहता येत नाही. मात्र मागील 7 वर्षांपासून चंदनवाले एकाच पदावर काम करत आहेत. चंदनवाले हे जळगावचे असल्यानं आधी भाजप नेते एकनाथ खडसे आणि आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा त्यांना वरदहस्त आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही,' असं देसाई म्हणाल्या होत्या. 

Comments