18 of February 2019, at 4.15 pm

जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सरकारला सवाल

 

येस न्युज मराठी नेटवर्क 

नागपूर, दि. ९ जुलै २०१८:

मागील तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबई आणि नागपूर जलमग्न झाले. या दोन्ही शहरातील जनजीवन विस्कळीत झाले, हे सरकारी यंत्रणांचे मोठे अपयश असल्याचा ठपका ठेवत ही जबाबदारी कोणाची? याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज उपस्थित केला.

मुसळधार पावसामुळे मुंबई, नागपूरसह संपूर्ण राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीकडे त्यांनी आज सकाळी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले. सरकारला धारेवर धरताना ते म्हणाले की, या पावसामुळे सरकारी यंत्रणाची पोलखोल झाली शुक्रवारी नागपुरात झालेल्या पावसामुळे विधीमंडळाच्या तळघरात पाणी गेले. गटारी तुंबल्या, त्यामुळे विद्युत पुरवठा बंद करुन विधानसभेचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. नागपुरात अधिवेशन घेताना सरकारने पूर्ण काळजी घेतली नाही, पुरेसे नियोजन केले नाही, म्हणूनच ही परिस्थिती उद्भभवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

नागपूर शहरातही अनेक भागात या पावसामुळे पाणी तुंबले. नागपूर शहर जलमय झाले. लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या गंभीर परिस्थितीत कोणतेही‘डिझास्टर मॅनेजमेंट’ अस्तित्वात नव्हते. याला जबाबदार कोण? या सर्व परिस्थितीची जबाबदारी मुख्यमंत्री कोणावर निश्चित करणार आहेत? जे नागपुरात घडले तेच मुंबईतही झाले. मुंबईचे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दोन्ही शहरांमध्ये राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या पक्षांची सत्ता आहे. तरीही या शहरांची ही दूरवस्था होत असेल तर दोन्हीकडचे पहारेकरी झोपलेत का? अशी प्रश्नांची सरबत्ती विखे पाटील यांनी विधानसभेत केली.

विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले की, नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यास आमचा विरोध नव्हता. पण त्यासाठी नालेसफाईसह सर्वतोपरी तयारी का केली नाही? नालेसफाईच्या नावाखाली नेहमीप्रमाणे काही लोकांनी आपले हात साफ करुन घेतले.

नागपुरकरांना झालेल्या त्रासाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Comments