23 of March 2019, at 9.45 am

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास पाच तज्ज्ञांची भेट

स्पेनच्या शिष्टमंडळ सदस्यांनी जाणून घेतली विद्यापीठाच्या अभ्यासक्रम, संशोधनाची माहिती

सोलापूर- स्पेनच्या एका पाच सदस्यीय तज्ञ समितीने बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास सदिच्‍छा भेट देऊन येथील अभ्यासक्रम, विविध उपक्रम तसेच संशोधनाची माहिती जाणून घेतली. विद्यापीठाने नव्यानेच सुरू केलेल्या ॲक्युप्रेशर, थेरपेटीक न्युट्रीशन कोर्स, हँडलूम युनिटचे या सदस्यांनी विशेष कौतुक केले.

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शिष्टमंडळातील सदस्यांचे स्वागत केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, कुलसचिव डॉ. विकास घुटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप आदी उपस्थित होते. स्पेनमधील मुर्शिया येथील कॅस्पर लेनार्ड वन हाऊट,  मनवेल वॉल्स सेविल्ला, जॉर्ज गार्सिचा मोनटोरो, अल्वारो गार्सिचा मोनटोरो, जोस बानोस लोपज या पाच सदस्यांनी विद्यापीठास भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत आशिष वर्मा आणि स्मार्ट सिटीचे तपन डंके आदी उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी महाराष्ट्र व भारतातील विद्यापीठ आणि शिक्षण पद्धतीविषयी विस्तृत माहिती स्पेनच्या सदस्यांना दिली. तसेच सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या स्किल डेव्हलपमेंटविषयक अभ्यासक्रमाची माहितीही त्यांना देण्यात आली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि तूर्कु विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराविषयी माहितीही स्पेनच्या सदस्यांनी जाणून घेतली. यावेळी स्पेनच्या सर्वच सदस्यांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रम व संशोधनाबद्दल माहिती जाणून घेऊन समाधान व्यक्त केले.

यावेळी या सदस्यांनी विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलातील विभागांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर वैद्यकीय केंद्र आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या संग्रहालयास भेट देऊन माहिती घेतली. येथील शिक्षण पद्धती आणि विद्यापीठाने विद्यार्थ्यांना देत असलेल्या सुविधेबाबत स्पेनच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला.

Comments