23 of March 2019, at 10.27 am

हिंमत असेल तर जैश-ए-मोहम्मदला भारतात पाठवा - परराष्ट्र मंत्री

येस न्युज मराठी नेटवर्क : 'शांतीची भाषा बोलणारे इम्रान खान एवढे उदार असतील, तर त्यांनी मसूद अजहरला भारताकडे सोपवावे. मग पाहू त्यांचे औदार्य,' अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तान आणि इम्रान खान यांना टोला लगावला आहे. त्या दिल्लीत . ‘भारतीय जग: मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 

         'पाकिस्तान भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. वर शांतीची भाषा बोलून खोटा आव आणत आहे. मी पाकिस्तानला विचारू इच्छिते की, त्यांनी एअर स्ट्राईकनंतर कोणातर्फे भारतावर हल्ला केला. पाकिस्तानच्या भूमीवरील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर भारताने कारवाई केली होती. एकाही पाक नागरिकाचा किंवा लष्करी अधिकाऱ्याचा जीव गेला नाही. केवळ दहशतवाद्यांवर कारवाई केली गेली. मग पाकने भारतावर प्रतिहल्ला कोणातर्फे केला? दहशतवाद्यांच्या बाजूने?' असे सवाल करत स्वराज यांनी पाकिस्तान आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर हल्ला चढवला.

 

'आधी तुम्ही दहशतवादाला आश्रय देता. त्यांना पैसा पुरवता. त्यांना सुरक्षा देता. या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांवर हल्ले केल्यानंतर त्यांच्यावर स्वतः तर कारवाई करत नाहीच. उलट, कारवाई करण्यास गेलेल्या पीडित देशाशी लढायला येता? त्या दहशतवाद्यांच्या बाजूने? जैश-ए-मोहम्मदसाठी तुम्ही तुमच्या लष्करी ताकदीचा वापर करता?' अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला खडसावले.

 

      'मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की, पाकिस्तानबाबत असलेला भारताचा दृष्टिकोन समजून घ्या. आपल्या इथे लगेच ज्या चर्चा सुरू झाल्या ना, की इम्रान खान खूप मोठे मुत्सद्दी, राजकारणी आहेत. इम्रान खान खूप औदार्य दाखवत आहेत. त्यांना तर शांतता हवी आहे. त्यावर मी म्हणते, शांतीची भाषा बोलणारे इम्रान खान एवढे उदार असतील, तर त्यांनी मसूद अझहरला भारताकडे सोपवावे. मग पाहू त्यांचे औदार्य,' असा टोला स्वराज यांनी लगावला.

 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर टीका

             'सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सर्वांत मोठी संस्था अत्यंत निष्प्रभावी बनली आहे. केवळ मध्यपूर्वेतच नव्हे, तर संपूर्ण जगभरात विविध ठिकाणी संघर्ष सुरू आहेत. अंदाधुंदी माजलेली आहे. मात्र, सुक्षा परिषद मौन धारण करून बसली आहे. काहीही करू शकत नाहीत. ते निष्प्रभ ठरत आहेत. कारण ते भूराजकीय सत्यतेला धरून कार्य करत नाहीत. सध्या जगभरातील संघर्षांना भूराजकीय परिस्थिती कारणीभूत आहे, ही बाब ते समजूनच घेत नाहीत. ही परिषद ज्या काळात तयार झाली, त्या काळात भारत स्वतंत्रही झाली नव्हता. त्यामुळे भारत त्यामध्ये नाही. त्या काळात आफ्रिकेतील अनेक देशही स्वतंत्र झाले नव्हते. तेही नाहीत. तेव्हा तयार झालेली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आजच्या काळातील भूराजकीय परिस्थितीचे प्रतिनिधीत्व करूच शकत नाही. ही परिषद आताच्या समस्यांचे निदान करू शकते का? त्यांचे निराकरण करू शकते का? तर मुळीच नाही,' असे स्वराज म्हणाल्या.

Comments