18 of February 2019, at 3.15 pm

नीरव मोदी परतफेड करणार दोन बँकांमधील कर्ज...

येस न्युज मराठी नेटवर्क: पंजाब नॅशनल बँकेचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवणारा नीरव मोदी दोन विदेशी बँकांचे थकवलेले कर्ज भरण्यास तयार झाला आहे. न्यूयॉर्कमधील एचएसबीसी आणि इस्रायल डिस्काऊंट बँक (आयडीबी) या दोन बँकांमधील कर्जाची नीरव मोदी परतफेड करणार आहे.

न्यूयॉर्कमधील एचएसबीसी बँकेतून नीरव मोदीच्या अंतर्गत येणाऱ्या दोन कंपन्यांनी २००८ साली १ कोटी ६० लाख डॉलरचे कर्ज घेतले होते. तर इस्रायल डिस्काऊंट बँकेतून २०१३ साली नीरव मोदीच्या एका कंपनीने १ लाख २० कोटी डॉलरचे कर्ज घेतले होते. नीरव मोदीने हे कर्ज थकवले होते. हे प्रकरण शेवटी न्यायालयात पोहोचले. कोर्टाने नीरव मोदीकडून कर्जाची वसुली करण्याची परवानगी दिली होती. यानुसार नीरव मोदीने या दोन्ही बँकांमधील कर्जाची परतफेड करण्याची तयारी दर्शवली आहे.गेल्या आठवड्यातच कोर्टाने या दोन्ही बँकांना कर्जवसुलीची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी दिली होती.

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा मुख्य आरोपी आणि हिरे व्यवसायिक नीरव मोदी, त्याचा मामा मेहुल चोक्सी आणि कुटुंबातील अन्य सदस्य परदेशात पसार झाले आहेत. पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नीरव मोदीने भारतातून पळ काढल्यानंतर भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केला होता. तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणेने लूकआऊट नोटीसही जारी केली होती. गेल्या आठवड्यात ईडीने नीरव मोदीच्या दुबईतील संपत्तीवर जप्तीची कारवाई केली होती. पंजाब नॅशनल बँकेला अद्याप नीरव मोदीकडून वसुली करण्यात अपयश येत असतानाच दोन परदेशी बँकांनी नीरव मोदीला हादरा दिला आहे. अमेरिकेतील या दोन बँकांचे कर्ज एकूण संपत्तीच्या तुलनेत कमी असून नीरव मोदीच्या वतीने कोर्टात बँकेला आश्वासन देण्यात आले की हे कर्ज फेडले जाईल. बँकेला मालमत्तांची जी यादी देण्यात आली आहे त्यात भारतातील तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या मालमत्तेचा समावेश आहे का, हे अद्याप समजू शकलेले नाही.

Comments