23 of March 2019, at 9.43 am

लोकसभा : कलम 144 पोलीस अधिनियम कलम 33 (एन) लागू

औरंगाबाद:-  महाराष्ट्र राज्यातील सर्व 48 मतदार संघातून लोकसभेचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तसेच दिनांक 10 मार्च, 2019 ते निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिनांकापर्यंत भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण महाराष्ट्राकरिता आदर्श आचारसंहिता लागू केली आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच शांततेत निवडणूक पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने, किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी मुद्रणालयाच्या सर्व माध्यमाद्वारे छपाई करण्याऱ्या मालकाने, तसेच प्रकाशकांनी नमुना मतपत्रिका छापतांना पुढील बाबींवर निर्बध घातले आहे. उमेदवाराचे नाव व त्यांना नेमून देण्यात आलेली चिन्हे छापणे. नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे. आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे, याचे पालन करावयाचे आहे.

तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी औरंगाबाद यांचे कार्यालय , उपविभागीय दंडाधिकारी औरंगाबाद , सिल्लोड , वैजापूर , कन्नड , पैठण-फुलंब्री , सर्व तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी , जिल्हा औरंगाबाद यांचे कार्यालय तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय  व सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहे यांचे आवारात कोणत्याही राजकीय पक्षांच्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना किंवा त्यांच्या हितचिंतकांना सभा घेता येणार नाही. 

त्याचप्रमाणे   सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे , निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स ,पॉम्पटलेट्स, कटआऊटस, पेंटिंग्ज, होर्डींग्ज लावणे तसेच निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभणे दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इ.बाबींवर तात्काळ जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध घातले आहेत. संबंधित ठिकाणी वरिलप्रमाणे कृती करण्यास कलम 144 अन्वये आचारसंहिता संपेर्पंयत निर्बंध राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  यांनी कळविले आहे.  

तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे 33 (एन) अन्वये सदरील निवडणुकीचे प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे हितचिंतक यांनी वाहनावर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यामुळे ध्वनीप्रदुषण होणे, सर्व सामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहचविणे व उशिरा रात्रीपर्यंत ध्वनीक्षेपण चालू ठेवणे ईत्यादी बाबींवर निर्बंध आहे.

त्यानुसार ध्वनीक्षेपकाचा वापर संबंधित पोलीस अधिकारी यांचे परवानगी शिवाय करता येणार नाही. सकाळी 6.00 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10.00 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्ष आणि निवडणूक लढविणारे उमेदवार आणि इतर व्यक्ती इत्यादी यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी (Fixed point) ध्वनीक्षेपकाचा वापर करावा व तत्ससंबधी अशा ध्वनीक्षेपकाचे वापरासंबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, तथा निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. हे आदेश दिनांक 10 मार्च, 2019 पासून ते आचारसंहितेची मुदत संपेपर्यंत अंमलात राहतील.

Comments