23 of March 2019, at 9.39 am

जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या सत्तेला सुरुंग कोण लावणार..?

जालना लोकसभा मतदारसंघ

येस न्युज मराठी नेटवर्क{गणेश जाधव जालना } :राज्यातल्या लोकसभेच्या महत्त्वपूर्ण लढतीपैकी जालना लोकसभेची लढत भाजपसाठी प्रतिष्ठतेची समजली जाते. भाजप नेते आणि खुद्द भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे या लढतीत असल्याने पक्ष आणि राज्यातील जनतेचे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष असणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. सलग सहा वेळा या मतदारसंघावर भाजपने आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. या सहापैकी शेवटच्या चार टर्म भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकहाती सत्ता मिळवली. दानवेंच्या याच एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसकडून सक्षम उमेदवार देण्याची तयारी सुरु आहे.

            गेली 20 वर्षे रावसाहेब दानवे यांनी जालना मतदारसंघावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. अशावेळी या लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसला प्रबळ उमेदवाराची गरज आहे. यापूर्वी 2009 मध्ये काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध चांगली लढत दिली होती. परंतु तरीही त्यांचा 8 हजार 482 मतांनी पराभव झाला होता. 2014 च्या निवडणुकीत मात्र मोदी लाटेत काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा दानवेंनी 2 लाख 6 हजार 798 एवढ्या प्रचंड मतांनी पराभाव केला होता. 1991 मध्ये काँग्रेसचे उमेदवार अंकुशराव टोपे या मतदारसंघातून भाजपचा पराभव करुन निवडून आले होते. परंतु त्यानंतरच्या सर्व सहा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा भाजपकडून पराभव झाला. पराभवाची ही परंपरा कशी खंडित करायची हा प्रश्न काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाला पडला आहे. काँग्रेस पक्षाकडे सात जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केला असून त्यापैकी तीन नावांची शिफारस प्रदेश काँग्रेस कमिटीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे केली आहे. परंतु यामध्ये रावसाहेब दानवे यांच्याशी सर्वार्थाने सक्षम लढत देऊ शकेल, असा उमेदवार दिसत नाही. अशा स्थितीत अन्य पक्षातील उमेदवार आयात करुन त्याला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेसचं राज्य पातळीवरील नेतृत्व करत आहे.

                 शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या नावाची या संदर्भातची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. खोतकर यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवून दानवे यांचा पराभव करु, असं जाहीर भाषणातून सांगितलं असलं तरी, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याचा अद्याप उल्लेख केलेला नाही. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याची राज्यमंत्री पद खोतकर यांच्याकडे असून अलीकडेच त्यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय पशु प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाचा संदर्भ देऊन खोतकर यांना इकडे-तिकडे न पाहण्याचा सल्ला दिला. आपण सोबतच राहू आणि तुमची इच्छा असेल तर घरातील भांडण घरातच मिटवू, असं मुख्यमंत्र्यांनी खोतकरांना व्यासपीठावर जाहीररित्या सांगितलं. त्यामुळे खोतकर लोकसभा निवडणूक लढवणार याची चर्चा जिल्ह्यात शिगेला पोहोचली आहे. प्रत्यक्षात खोतकर यांनी मात्र आता आपण फार पुढे गेलो असून दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं.

      दरम्यान दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना धडा शिकवण्यासाठी, जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनीही केली आहे. मात्र ही घोषणा प्रत्यक्षात उतरल्यास रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर आणि बच्चू कडू असा तिहेरी सामना रंगू शकतो. मात्र या तिघांमध्ये अद्यप दृष्टीक्षेपात नसला तरी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ही लढत चौरंगी करु शकतो. अलिकडच्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या सभेला झालेली गर्दी प्रस्थापित पक्षांची राजकीय गणित बिघडवू शकते असंच दिसतं आहे.

मतदारसंघाचा इतिहास

जालना लोकसभा मतदारसंघाची वैशिष्ट्य म्हणजे मागील सलग सहा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय होऊन काँग्रेसचा पराभव झाला आहे. एकेकाळी हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. बाळासाहेब पवार, अंकुशराव टोपे यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेसच्या वतीने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर ज्येष्ठ नेते पुंडलिक हरी दानवे यांनी भाजपकडून या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. पुंडलिक हरी दानवे आणि बाळासाहेब पवार प्रत्येकी दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे उत्तमसिंग पवार यांनीही भाजपकडून दोन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. पुंडलिक हरी दानवे आणि उत्तमसिंग पवार हे आता भाजपमध्ये नाहीत. 1996 मध्ये भाजपने या पूर्वी दोन वेळा खासदार असलेले पुंडलिक हरी दानवे यांना उमेदवारी नाकारुन भाजपकडून आलेले उत्तमसिंग पवार यांना उमेदवारी दिली होती, तेव्हापासून म्हणजेच 1996 पासून आतापर्यंत सलग सहा वेळा जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय झाला आहे. त्यापैकी सलग म्हणजेच 1999 पासून विद्यमान खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा विजय झाला आहे.

मतदारसंघाची रचना

या लोकसभा मतदारसंघात जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी तीन म्हणजेच एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. ज्यात जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.

  • विधानसभा मतदारसंघावर कोणाची सत्ता?

  • *जालना विधासभा मतदारसंघात अर्जुन खोतकर (शिवसेना)

  • *बदनापूर विधानसभा मतदार संघात नारायण कुचे (भाजपा)

  • *भोकरदन मतदारसंघात संतोष दानवे (भाजपा)

  • *औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघात हरिभाऊ बागडे (भाजप)

  • *पैठण मतदार संघात संदीपान भुमरे (शिवसेना)
  • *सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तार(काँग्रेस)

या लोकसभा मतदारसंघात आज रोजी 18 लाख 43 हजार 131 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बाजावतील. हा आकडा 2014 ला 16 लाखांच्या आसपास होता. यावेळी या मतदारसंघात 1900 पेक्षा अधिक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

स्थानिक राजकीय संस्थांमध्ये विविध पक्षाची ताकद 

या लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघांवर भाजपचं प्रतिनिधित्व असलं, तरी उर्वरित 3 मतदारसंघ अन्य पक्षांकडे आहेत. यापैकी भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व रावसाहेव दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे भाजपकडून करत आहेत. रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखाली रामेशवर कारखाना याच भागात आहे. भोकरदन जाफराबाद पंचायतसमित्या भाजपच्या ताब्यात आहेत. भोकरदन नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे.

कोणाची सत्ता?

* अंबड नगरपरिषद - भाजप
* बदनापूर नगरपंचायत - भाजप
* बदनापूर पंचायत समिती - शिवसेना
* अंबड पंचायत समिती - राष्ट्रवादी काँग्रेस
* जालना नगरपरिषद - काँग्रेस
* भोकरदन नगरपरिषद - काँग्रेस
* सिल्लोड नगरपरिषद - काँग्रेस
* फुलंब्री नगरपंचायत - भाजप
* पैठण नगर पंचायत - भाजप
* जालना जिल्हा परिषद - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस

मुद्दे आणि जातीय समीकरणे

लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत असल्याचे दानवे यांनी आपल्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं. मात्र 20 वर्ष खासदार असलेल्या दानवेंच्या मतदारसंघात गेल्या वर्षभरात रस्त्याच्या कामाचा आणि विविध उद्घाटनांचा सपाटा लावला आहे. परंतु गेली 19 वर्ष हे दानवेंना का जमलं नाही हा सामन्यांच्या मनातला प्रश्न आहे. जालना खामगाव रेल्वे प्रश्न, जिल्ह्यातील मध्यम सिंचनाची कामे, याशिवाय ग्रामीण पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या कामाची समस्या अशी अनेक प्रश्न मतदारसंघात कायम आहेत. अशावेळी काँग्रेसला विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाण्याचा मोठा मुद्दा आहे. मात्र दानवे यांचा तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, बुथनिहाय झालेलं नियोजन काँग्रेसपुढे मोठं आव्हान उभे करु शकतं. अशावेळी तेवढ्याच ताकदीचा सक्षम उमेदवार म्हणून खोतकरांचे आव्हान उभे राहिल्यास दानवे विरुद्ध खोतकर असा मोठा सामना रंगलेला पाहायला मिळेल.

आधीच खोतकर यांनी दानवे यांच्यावर हुकूमशाही वृत्तीचा आरोप केला आहे. सध्या हे आरोप प्रत्यारोप मतदारसंघात चर्चेचे विषय ठरले आहे. मात्र यामुळे दानवे विरुद्ध खोतकर असाच सामना रंगणार हे चित्र सर्वसामान्य जनतेच्या मनावर बिंबवलं गेलं आहे. साहजिकच मतदार संघात या दोन्ही नेत्यांच्या कामाचा आणि पूर्वीच्या राजकारणाचा इतिहास चवीने चर्चिला जातोय, सामान्य जनतेच्या दृष्टिकोन आणि कौल मतपेटीतून स्पष्ट होत असला तरी विकासाच्या मुद्द्यावर मात्र जनता तडजोड करणार नसल्याचे मतदारसंघात चित्र आहे.

सुमारे 18 लाख 43 हजार 131 मतदार असलेल्या या लोकसभा मतदारसंघात 25 टक्के मतदार दलित आणि मुस्लिम आहेत. उर्वरित 75 टक्क्यात 30 टक्के समाज मराठा तर 43 टक्क्यात धनगर, माळी, वंजारी,गवळी,आदिवासी इत्यादी या प्रमुख जातींचा समावेश आहे. तर इतर 2 टक्के आहेत.

2009 लोकसभा निवडणूक

उमेदवार पक्ष एकूण मते
रावसाहेब दानवे भाजप 350710
कल्याण काळे काँग्रेस 342228

रावसाहेब दानवे 8 हजार 482 मतांनी विजयी

2014 लोकसभा निवडणूक

उमेदवार पक्ष एकूण मते
रावसाहेब दानवे भाजप 591428
विलास औताडे काँग्रेस 384630

रावसाहेब दानवे 2 लाख 6 हजार 798 मतांनी विजयी

Comments