23 of March 2019, at 10.28 am

‘लिंगायत स्वतंत्र धर्मच’ या पुस्तकाचे रविवारी कोल्हापुरात प्रकाशन

कोल्हापूर - ‘लिंगायत स्वतंत्र धर्मच’ या बहुचर्चित पुस्तकाचे रविवार, दि़ १ जुलै रोजी येथील दसरा चौकातील चित्रदुर्ग विरक्त मठात प्रकाशन होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी येथील चित्रदुर्ग विरक्तमठात मासिक शरण संगम-अनुभाव मंटपाचे आयोजन केले जाते़. यामध्ये बसवादी शरणांच्या वचन साहित्यावर-चरित्रावर अभ्यासकांची व्याख्याने होतात. गेल्या अनेक वर्षापासून निरंतरपणे सुरू असलेल्या या उपक्रमात जुलै महिन्यातील पहिल्या रविवारी सायंकाळी ६ वाजता ‘लिंगायत स्वतंत्र धर्मच’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्या सरलाताई पाटील, राजशेखर तंबाके यांनी दिली. संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली, लेखक चन्नवीर भद्रेश्वरमठ आणि प्रकाशक दत्ता थोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास प्रा. राजा शिरगुप्पे, धनाजी गुरव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चन्नवीर भद्रेश्वरमठ हे ‘पुण्य नगरी’च्या सोलापूर आवृत्तीमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. महात्मा बसवेश्वर आणि लिंगायत धर्म याबाबत केवळ लिंगायत नव्हे, तर सर्वच समाज घटकांत उत्सुकता आहे. लिंगायतांच्या स्वतंत्र धर्म मागणीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लिंगायत धर्माची सर्वंकष मांडणी करणारे ग्रंथ मराठीत उपलब्ध नाहीत. जे काही साहित्य आहे ते मूळ कन्नड ग्रंथांचे मराठीतील अनुवादाच्या स्वरूपात आहे. मराठीतील लेखकांनी स्वतंत्र प्रयत्न केला असला, तरी वाचकांची जिज्ञासा पूर्ण करण्यात या पुस्तकांच्या मर्यादा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य वाचकांना हा विषय समजण्यात अडचणी होत्या. या पार्श्वभूमीवर ‘लिंगायत स्वतंत्र धर्मच’ हे पुस्तक मराठी वाचकांच्या मनातील सर्व जिज्ञासा पूर्ण करणारे ठरेल, असा विश्वास लेखक चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी व्यक्त केला आहे. सोलापुरातील प्रगती प्रकाशन या संस्थेचे दत्ता थोरे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या प्रकाशन संस्थेचे आणि लेखक चन्नवीर भद्रेश्वरमठ यांचे हे पहिले पुस्तक आहे. या कार्यक्रमात पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बाळासाहेब पाटील, चंद्रशेखर बटकडली, नीलकंठ मुगळखोड, बाबुराव तारळी, विलास आंबोळे यांनी केले आहे.

Comments