23 of March 2019, at 10.47 am

शाश्वत सिंचन सुविधा देणारी ‘मागेल त्याला शेततळे योजना’

शेतीला आश्वासित सिंचन-सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी कृषि विभागाने मागेल त्याला शेततळे योजना आणली आहे.

 

शेतीला आश्वासित सिंचन-सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी कृषि विभागाने मागेल त्याला शेततळे योजना आणली आहे. पावसाने ओढ दिल्यावरही सिंचन सुविधा पुरवू शकणाऱ्या या योजनेबाबत लेख -

  • सोलापूर दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. पठारी भूभाग, तुलनेने कमी वनक्षेत्र, मोकळी ओसाड माळराने यामुळे जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडत नाही. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2016 मध्ये ‘मागेल त्याला  शेततळे’ योजना सुरू केली. योजनेचा लाभ जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांनी  घेतला आहे. पाणी शिवारातच उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे.

‘मागेल त्याला शेततळे’ योजना दुष्काळावर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शेततळ्यामुळे मुबलक पाणी शेतातच उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्याला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत नाही. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास कमीत कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेता येऊ शकते. शेतकऱ्यांकडे स्वतःची सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजनेची नितांत आवश्यकता आहे. यामधून शेतकऱ्याची सिंचन योजना मजबूत होण्यास मदत होणार आहे. योजनेमध्ये 225 चौरस मीटर ते 900 चौरस मीटरपर्यंतच्या शेततळ्यांसाठी अनुक्रमे 22 हजार 110 ते 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांचा गट तयार करून एकत्रितरित्या  सामुदायिक शेततळे मिळण्याचीही तरतूद आहे.

 जमिनीचा सातबारा, 8 अ चा उतारा, दारिद्र्यरेषेखालील कार्ड/आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला ही कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत. आत्महत्याग्रस्त आणि दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात  येते. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मागेल त्याला शेततळे हा पर्याय निवडावा. त्यानंतर अर्जात माहिती भरून नमूद  केलेली जोडपत्रे स्कॅन कॉपी करून अपलोड करावीत. स्वतःच्या स्वाक्षरीसह सर्व कागदपत्रे पोहोचपावतीही डाऊनलोड करून जवळ ठेवावी. अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या मदतीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

शेततळ्याचे आकारमान व अनुदान :-

 

अक्र.

शेततळ्याचे आकारमान (मीटर)

अनुज्ञेय अनुदान इनलेट आऊटलेटसह (रूपये)

अनुज्ञेय अनुदान इनलेट

आऊटलेट विरहित

1

15 x 15 x 3

22 हजार 110

--

2

20 x 15 x 3

29 हजार 706

26 हजार 206

3

20 x 20 x

40 हजार 467

36 हजार 967

4

25 x 20 x 3

50 हजार

47 हाजर 728

5

25 x 25 x 3

50 हजार

50 हजार

6

30 x 25 x 3

50 हजार

50 हजार

7

30 x 30 x 3

50 हजार

50 हजार

*****

Comments