23 of March 2019, at 9.39 am

रिझर्व्ह बॅंकेकडून या 6 बॅंकांवर निर्बंध ?

पीएनबी, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॅंकांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आणखी सहा बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आर्थिक निर्बंध (पीसीए) घातले जाण्याची शक्यता आहे. या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), युनियन बँक ऑफ इंडिया आणि सिंडिकेट बँक यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. जर आरबीआयकडून निर्बंध आणले गेले तर आर्थिक स्थिती खालावलेल्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलीन करण्याची केंद्रीय अर्थ मंत्रालयाची योजना प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. तसंच, या बॅंकांकडून कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात. अर्थ मंत्रालयाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या सहा बँका सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँक त्यांना कोणतीही सवलत देण्यास तयार नसल्याचे वृत्त आहे. पुढील महिन्याभरात जर आरबीआयने या बॅंकांना पीसीए श्रेणीत टाकलं तर निर्बंध घालण्यात येणाऱ्या बँकांची संख्या १७ वर पोहोचणार आहे. यापूर्वी गेल्या महिन्यातच अलाहाबाद बॅंकेला आरबीआयने या श्रेणीमध्ये टाकलं आहे. देना बँकेलाही नवी कर्जे देण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्या बँकांवर निर्बंध घातले जातात, त्यांच्या शाखांची संख्या न वाढवता तोट्यातील शाखा बंद करण्यावर भर दिला जातो. या शिवाय त्यांचा लाभांशही रोखला जाण्याची शक्यता असते. बँकेच्या कर्जवितरणावरही बंदी घातली जाते. अनेक अटी आणि शर्ती घातल्यानंतरच त्यांचा कर्जवितरणाचा मार्ग मोकळा होतो. त्यातच गरज पडल्यास रिझर्व्ह बँकेतर्फे संबंधित बँकेच्या लेखापरीक्षणाची आणि पुनर्रचनेचेही आदेश दिले जाऊ शकतात.

Comments